Ad will apear here
Next
‘हास्यरेषांचा आनंदयात्री’


२९ जुलै हा हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख... 
........
अचानकपणे जुन्या फोटोंच्या खजिन्यातून मला आलेलं एक ग्रीटिंग कार्ड अवचित हातात आलं. त्यावर एक फोटो चिकटवलेला होता. तो फोटो पाहून मन एकदम अठ्ठावीस वर्षे मागे गेलं. चित्रकार, हास्यचित्रकार, सिद्धहस्त लेखक व साक्षेपी संपादक श्री. शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमातील फोटो होता तो. पुण्यातील प्रभात रोडच्या आतील गल्लीत असलेल्या ‘संपादन’ नावाच्या श्री. मुकुंदराव व सौ. शांताबाई किर्लोस्कर यांच्या बंगल्यातील झोपाळ्यावर स्वत: मुकुंदराव किर्लोस्कर यांनी टिपलेला होता तो फोटो. दृश्यमाध्यमांविषयी झालेल्या कार्यशाळेच्या प्रसंगात डॉ. भय्यासाहेब ओंकार, उमेश गुप्ते, मुरली लाहोटी, रवी परांजपे, चित्रलीला निकेतनच्या सौ. सुनीती जाधव-आंबिलढोक, श्याम देशपांडे, मी आणि ग्रुपच्या मध्यभागी सर्वांत सीनियर असे श्री. शि. द. फडणीस असा तो फोटो. दिनांक होता १२ जुलै १९९२. त्याचं ग्रीटिंग करून मुकुंदरावांनी त्यांच्या खास शैलीत एका पत्रासोबत तो मलाही पाठवला होता. 

आपल्या मनाची एक गंमत आहे. एवढ्याशा धाग्यावरून ते आपल्याला एका क्षणात किती मोठा प्रवास घडवून आणेल याचा काही नेम नाही. ती अठ्ठावीस वर्षे मागे सारत मला पुढच्याच क्षणी गेल्या वर्षीचा एक दिवस आठवला. सोमवार, २९ जुलै २०१९. मी माझ्या मोबाइलवरून फोन लावला होता. पलीकडून ‘हॅलो’ ऐकू आल्यावर मी ‘जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असं आधी म्हणून टाकलं आणि मग सांगितलं, की मी सतीश बोलतोय. पलीकडची व्यक्ती त्या दिवशी बरोबर चौऱ्याण्णव वर्षांची झालेली होती; पण त्याच क्षणी त्या व्यक्तीने मला लगेचच विचारले, ‘हं... काय म्हणतीय तुमची फोटोग्राफी? कॅलेंडरची तयारी सुरू झाली का?’ जुलै १९९२मधील त्यांचं बोलणं व जुलै २०१९मधील बोलणं... काहीच फरक जाणवत नव्हता. तोच त्वरित असा रिस्पॉन्स, तीच तरतरी. ते होते आजही अत्यंत तरुण असलेले हास्यचित्रकार श्री. शि. द. फडणीस. कुठून आणत असतील ही मंडळी त्यांच्यातील ऊर्जा?

आपल्याला सगळ्यांना अक्षर ओळख करून दिली जाते ती चित्रांच्या माध्यमातूनच. अ- अननसाचा, आ- आगगाडीचा वगैरे. मग अक्षरांपासून शब्द अन् मग भाषा. हा अभ्यास होताना नंतर बऱ्याच जणांच्या बाबतीत चित्रकलेची ही जमलेली मैत्री कमी कमी होत जाऊन जवळजवळ लुप्तच होते; पण काही जण शब्दांचा जरासुद्धा सहारा न घेता फक्त कुंचल्याच्या आधारे आपली कारकीर्द घडवतात. महान चित्रकार होतात. त्यातही हास्यचित्रकाराचे काम जास्तच अवघड. त्याला फक्त रेषेवर प्रभुत्व असून चालत नाही, तर कल्पकता असावी लागते, विनोदबुद्धीची देणगी असावी लागते तरच सर्जनाचा जन्म होतो. हास्यचित्रकार शि. द. फडणीस हे या सर्वांचे धनी आहेत. त्यामुळे त्यांची सोपी, उत्तम रंगसंगतीची, मथळ्याशिवायची हास्यचित्रं भाषा, प्रदेश किंवा वर्गांच्या सीमा ओलांडून दैनंदिन जीवनात आनंदाची पखरण करतात. आणि हे थोडीथोडकी नव्हे तर गेली जवळ जवळ सत्तर वर्षे. 

लताबाईंच्या आवाजातील ‘नौजवान’ या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं आणि सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं एक अप्रतिम गाणं आहे – ‘ठंडी हवाएँ, लहरा के आयें रुत है जवां, तुमको यहाँ, कैसे बुलाएँ....... ठंडी हवाएँ...’ हा चित्रपट १९५१ सालचा. हे गाणं आजही इतकं ताजं आणि टवटवीत आहे, की कोणत्याही वेळी ते ऐकलं, की मन प्रसन्न होऊन जातं. शि. द. फडणीस यांचीही चित्रमुशाफिरी त्या वेळपासूनचीच. त्या काळातील त्यांची चित्रं पाहिली, की आजही त्या गाण्यातल्या प्रमाणेच थंड हवेची झुळूक आपल्याला अंतर्बाह्य लपेटून राहते. ‘चाँद और तारे, हँसते नज़ारे, मिल के सभी, दिल में सखी, जादू जगाये’ अशीच अवस्था होऊन जाते. 

त्यांचं एक चित्र आहे १९५२ सालातील ‘मोहिनी’ या दिवाळी अंकासाठी केलेलं. त्यांनी केलेलं दिवाळी अंकाचं पहिलं मुखपृष्ठ. बस स्टॉपवर एक युवती व एक युवक उभे आहेत. त्याच्या निळसर बुशशर्टवर काळ्या उंदरांचे पळतानाचे छाप आहेत, तर युवतीच्या लाल रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगातील मांजराचे दबा धरून बसलेले छाप आहेत. ती मांजरे जणू त्या उंदरांच्या मागे पळत आहेत. त्या दोघांच्याही चेहऱ्यावरील भाव, तिच्या हातातील पर्स अन् त्याच्या हातातील छत्रीला लटकवलेला आकाशकंदील, वाऱ्याची दिशा, कंदीलाच्या हलणाऱ्या झिरमिळ्या या सर्वांना उठाव आणणारी ‘लेमन यलो’ रंगातील पार्श्वभूमी. चित्र पाहताच कोणाच्याही चेहऱ्यावर हसू न आले तरच नवल. अशी त्यांच्या चित्रांची मोहमयी दुनिया गेली सत्तर वर्षे रसिकांना मोह घालत आलेली आहे. 

१९९२ साली शि. द. फडणीस यांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला. त्यानंतर अनेक वेळा त्यांना भेटत गेलो. कधीही घरी गेलं तरी फडणीस आणि त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला नेहमी चकाचक आवरून तयार असलेले. जणू आत्ता त्यांना कुठे बाहेर जायचे आहे. नेहमीच हसतमुखाने स्वागत. प्रकाशचित्रकलेविषयी आपुलकीने चौकशी. ‘नवीन काय करताय?’ हा ठरलेला प्रश्न. ‘प्रकाशचित्रकला ही काळाला गोठवून ठेवते. प्रत्येक चांगला फोटोग्राफ हा एखाद्या शिलालेखासारखा असतो’ असे ठाम मत. कोणाबद्दलही कणभरही कटूता नाही. कायम प्रसन्न भाव. असे असल्यावर मग का नाही ते सर्व त्यांच्या चित्रातून पाझरणार?

बरेच दिवस त्यांचा फोटोसेशन करण्याचे माझ्या मनात होते. एक-दोनदा तसे बोलणेही झाले होते; पण तो योग काही जमत नव्हता. २०१८च्या ऑगस्ट महिन्यात हा योग जुळून आला. त्यांची मुलगी रूपा देवधर हिनेही मनावर घेतल्याने फोटोसेशन ठरला. १६ ऑगस्ट २०१८ रोजी शि. द., सौ. शकुंतला देवधर आणि त्यांच्या लीना व रूपा या दोन्ही मुली माझ्या स्टुडिओत आले. 

‘शिदं’च्या हातात एक मोठे पॅक होते. दोन फोल्डेबल इझल होती. जागा ठरवून घेत त्यांनी स्वतः एकेक साहित्य बाहेर काढायला सुरुवात केली. नेटकेपणाने इझल तयार करून त्यावर एक चित्रही लावले. व मला म्हणाले, ‘पाकणीकर, वेळ वाया जायला नको म्हणून मी आधी काढलेलीच दोन-तीन चित्रं बरोबर घेऊन आलो आहे. ही पाहा.’ असे म्हणत त्यांनी मला पहिले चित्र दाखवले. एका युवतीच्या मागे तिचा प्रियकर धावतोय. तिला देण्यासाठी त्याच्या हातात गुलाबाचे फूल आहे; पण ती त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता पुढे निघालीय. त्यामुळे युवकाने त्याच्या डोळ्यांसकट त्याचा चष्मा तिच्या पुढे फेकला आहे. आणि ते डोळे आता तिच्याकडे पाहत आहेत, असे ते चित्र. मग म्हणाले, ‘मी चित्र खरोखरी काढणार नसलो, तरी मला जरा थोडेसे पाणी लागेल. वातावरण तर जमायला पाहिजे ना?’ मग त्यांनी रंग काढून त्या चित्रामध्ये असलेली एक शेड बनवली. आणि जणू आत्ताच ते चित्र पूर्ण झालंय अशा रीतीने त्यावर शेवटचा हात फिरवतानाची ‘पोझ’ घेतली. सच्चा परफॉर्मर काय असतो याचं ते प्रात्यक्षिक होतं. 

‘आता दुसरं चित्र,’ असं म्हणत अत्यंत मिश्किलपणे त्यांनी ते चित्र माझ्या समोर धरलं. एका फोटोग्राफरकडे फोटोसाठी जाताना किती समयसूचकता? त्या दुसऱ्या चित्रात एक फोटोग्राफर इमारतीच्या गच्चीवरून समोरच्या इमारतीच्या एका खिडकीत असलेल्या युवतीचा फोटो काढण्याच्या तंद्रीत आहे. हे करताना आपण गच्चीच्या टोकावर आलोय याचेही त्याला भान नाही. त्यामुळे त्याची पत्नी पाठीमागून येऊन तिने त्याला आपल्या हातांच्या विळख्यानी ओढून धरलंय. म्हटलं तर साधा अर्थ, म्हटला तर किती गहन अर्थ. कमीत कमी रेषा व उत्साही रंग. कोणत्याही भाषेतील हजारो शब्द जे व्यक्त करू शकणार नाहीत, ते सर्व त्या चित्रात उतरून आलेलं. 

त्यांच्यानंतर सौ. शकुंतला यांचीही काही प्रकाशचित्रे मी टिपली. हास्यचित्रकाराबरोबर त्याच्या लेखिका असलेल्या पत्नीचाही फोटोसेशन पार पडला. दोन–अडीच तास त्यांच्या प्रसन्न उपस्थितीचा अनुभव हा फोटोसेशनच्या अनुभवापेक्षा कधीही जास्त स्मरणात राहील असा. 

एक रुखरुख मनात राहिली होती. त्यांनी फोटोसेशनच्या वेळी प्रत्यक्ष चित्र काढले नव्हते ही; पण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे पुढे सव्वा वर्षात माझी ती इच्छाही पूर्ण झाली. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचा सांगता कार्यक्रम होता, डॉ. दिनेश व सौ. ज्योती ठाकूर यांनी आयोजित केलेला. ‘पुलं’च्याच मालती-माधव या इमारतीच्या पार्किंगमध्ये. ‘पुलं’चे आप्त-स्वकीय जमलेले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शि. द. फडणीस यांची प्रमुख उपस्थिती. दोघेही नव्वदी पार केलेले; पण तरीही चैतन्याचा अखंड झरा. ‘जरे’चा जराही स्पर्श न झालेले. शिवशाहीरांनी त्यांच्या खास शैलीत ‘पुलं’च्या व सुनीताबाईंच्या आठवणींचा फड जमवला. त्यानंतर होते ‘शिदं’चे प्रात्यक्षिक. इथेही त्यांनी त्याच नेटकेपणाने इझल उभारणी केली. अगदी त्याच्यावरील वेष्टन व त्याची दोरीही व्यवस्थित ठेवून दिली. सर्व जण श्वास रोखून बसलेले. २३ इंच बाय ३६ इंच आकाराचा पांढरा शुभ्र कागद ‘शिदं’चा कुंचला टेकण्याची वाटच पाहत होता जणू. त्यांनी स्पंजचा वापर करून स्वतःच तयार केलेला जाड रेषा देणारा तो कुंचला. अंदाज घेत तो ब्रश फिरू लागला. आणि पाचच मिनिटात त्या जादूच्या रेषांनी कागदावर साक्षात पु. ल. अवतरले. ते एवढ्या मोठ्या कागदाच्या एका बाजूला अवतरले होते. बाकी भाग रिकामाच. ‘शिदं’नी झोकात एसपी अशी त्यांची स्वाक्षरी केली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘शिदं’च्या चेहऱ्यावर परत तेच मिश्कील भाव. अजून चित्र पूर्ण झालेले नाही हे सांगणारे. मग त्यांनी कागदाच्या उजव्या रिकाम्या जागेत एक आडवी रेष काढली आणि त्यावर उभे लेखणीचे चित्र. पुन्हा एकदा टाळ्या. परत तोच मिश्कील भाव... आता थोडं थांबा सांगणारा. शेवटी त्या लेखणीच्या निबमधून उडू लागले आनंदाचे कारंजे. ‘शिदं’नी त्या दिवशीची तारीख टाकली ८.११.२०१९. आता मात्र टाळ्या थांबेचनात. ‘पुलं’नी दिलेल्या आनंदाचे काही मोजक्याच रेषांच्या साह्याने झालेले ते प्रकटीकरण त्या वेळच्या उपस्थितांपैकी कोणीच कधीच विसरू शकणार नाहीत. ‘पुलं’नी आपल्याला विविध माध्यमांतून आनंद दिला, तर ‘शिदं’नी त्यांच्या निर्विष चित्रांतून.  

चित्रांतून आनंद वाटत जाणाऱ्या या आनंदयात्रीला स्वामित्व हक्कासाठीही जोरदार लढा द्यावा लागला आहे. कलेचे विश्व हे भलेही मानवी पातळीच्या वर असेल, तरीही कलाकाराला जगणं हे दैनंदिन आहे. त्याला लागणाऱ्या गरजा त्याच्या कलेतूनच जर भागणार असतील, तर त्याचे न्याय्य हक्क त्याला मिळालेच पाहिजेत. कलाविश्व कितीही मोठं असलं, तरी त्याचा निर्मिक याला ऐहिक जीवन आहे आणि ते सन्मानाने जगण्यासाठी लागणारं त्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे. मग असे लढे देऊनही इतकी ऊर्जा हे आणतात कुठून? या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते त्यांच्याच ‘रेषाटन’ या पुस्तकाच्या वाचनातून. ‘शिदं’च्याच शब्दांत सांगायचं, तर ‘आयुष्यात सुंदर, संपन्न, निकोप दृष्टिकोन काय असावा याविषयी जगभरातील संत-महात्म्यांनी भरपूर लिहून ठेवलं आहे. माणूस हे सारं विसरतो. जळमटं साठतात. ती दूर करण्यासाठी व या विचारांची उजळणी व्हावी म्हणून शंभर-दीडशे वर्षांनी आणखी कोणी तरी संत जन्माला येतो. सुविचारांची कमतरता कधीच नसते. आपण यातून शोषून किती घेतो एवढंच उरतं. मला जेवढं जमलं तेवढं घेतलं. आयुष्याच्या या टप्प्यावर आपण अगदी शांत, मुक्त व तृप्त आहोत. परमेश्वराकडे काहीही मागणं नाही. कशाच्याही मागे धावायचं नाही. पूर्वीप्रमाणेच आता आणि पुढेही चिरतरुण आस्वादक दृष्टीने सर्व गोष्टींचं स्वागत करायचं आहे.’

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LXUXCO
Similar Posts
‘ख्याल-महर्षी’ ऋषितुल्य ख्यालमहर्षी पं. मल्लिकार्जून मन्सूर यांचा स्मृतिदिन १२ सप्टेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
कॅमेऱ्यामागचा जादूगार! सुप्रसिद्ध फ्रेंच फोटोग्राफर हेन्री कार्तीय ब्रेसाँ यांनी सर्व फोटोग्राफर्सबद्दल असे म्हणून ठेवले आहे, की ‘आम्ही या जगातील असे प्रेक्षक आहोत, जे जगाकडे सदासर्वकाळ पाहत असतात; पण आमच्या निर्मितीचा मात्र एकच एक क्षण असतो तो म्हणजे जेव्हा आमच्या कॅमेऱ्याचे शटर एका सेकंदाच्या अंशाने क्लिक होते तो क्षण!’
स्वर-भावगंधर्व २६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
‘टू सर.... विथ लव्ह... अँड रिस्पेक्ट!’ सु. द. तांबे यांच्यासारख्या सर्वच शिक्षकांकडून त्यांच्या विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले गेले. सर, आजही मी जेंव्हा जेंव्हा कागदावर काही लिहिण्यासाठी खिशाचे फाउंटन पेन काढतो, त्या वेळी मला १९७५ सालचे तुम्ही डोळ्यांसमोर येता आणि नकळतच माझ्या हातून कागदावर रेखीव अक्षरे उमटू लागतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language